पुणे: मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर टीका केल्याने नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासले काळे
पुणे, १८ नोव्हेंबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना पुण्यात घडली. माध्यमांशी बोलत असतानाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. यावेळी पोलिसांनी नामदेव जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले.
पवार समर्थकांनी नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासत असताना पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. जाधवांना काळे फासण्यात पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे.
नामदेव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करीत होते. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. तसेच त्यांनी जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला. यानंतर भांडारकर संस्थेने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द केला. त्याच दरम्यान नवी पेठेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या चेहर्याला काळे फासले.
दरम्यान, शरद पवार यांच्या भूमिकेमुळेच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालेले नाही, त्यांनी स्वतः मात्र ओबीसी दाखला मिळवून निवडणुका लढल्या अस आरोप नामदेवराव जाधव यांनी केला. त्यावरून बराच वाद ही निर्माण झाला होता. जाधव यांनी माफी न मागितल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार भवनासमोर काळे फासले.
दरम्यान, हा प्रकार घडवून आणणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.