पुण्याचा खासदार कोण मोहोळ की धंगेकर ? मंगळवारी मतमोजणी
पुणे,03 जून 2024: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. गेल्या २० दिवसांपासून या निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ बाजी मारणार की काँग्रेसचे रवींद्र धंगेकर याचे तर्क वितर्क लढविले जात आहे. अनेकांनी पैजा देखील लावलेल्या आहेत. अखेर यावर उद्या (ता. ४) शिक्कामोर्तब होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एएमआयएमचे अनिस सुंडके हे चार प्रमुखांसह ३५ उमेदवार रिंगणात आहेत. २०१४, २०१९ या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये पुणेकरांनी भाजपचा उमेदवार संसदेत पाठवलेला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजप हॅटरिक करणार की काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार याकडे लक्ष लागलेले आहे.
पुणे लोकसभेच्या प्रचारात वाहतूक कोंडी, पर्यावरणाचे रक्षण, विमानतळ, मेट्रो विस्तारीकरण, पाणी पुरवठा हे मुद्दे महत्त्वाचे ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. राष्ट्रीय मुद्द्यांसह उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांचे जाळे, अचडणीच्या काळात मदत करणारा कार्यकर्ता असे स्थानिक मुद्दे देखील निवडणुकीत प्रभावी ठरलेले आहेत. त्यामुळे प्रमुख उमेदवारांनी प्रत्येक आपण तळागाळातील लोकांपर्यंत कसे जोडले गेलेलो आहोत प्रचाराच्या दरम्यान दाखविण्याचा प्रयत्न केला.
सोसायट्यांसह झोपडपट्टी भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. ही निवडणूक एकतर्फी न होता चुरशीची होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांमधील धाकधूक वाढली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारी तीन पर्यंत पुण्याचा खासदार कोण असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.