पुणे: भाजपकडून कसब्यात हेमंत रासने, चिचंवड मध्ये अश्विनी जगताप
पुणे, ४ फेब्रुवारी २०२३: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर, चिंचवड मधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.
कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. २६ फेब्रुवारी रोजी या जागेवर मतदान होणार आहे. भाजपकडून कसब्यामध्ये टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाला टिळक यांच्यासह हेमंत रसणे, गणेश बिडकर, धीरज घाटे हे इच्छुक होते. या पाच उमेदवारांची नावे प्रदेशाकडे पाठविली होती. त्यानंतर भाजपच्या सर्वेक्षणात रासने यांचे नाव आघाडीवर होते.
रासने यांना उमेदवारी दिली तरी टिळक कुटुंब बाबत महत्त्वाचा निर्णय घेणे भाजपसाठी आवश्यक होते. त्यामुळे कुणाला टिळक यांची प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार रात्री केसरीवाड्यात जाऊन टिळक यांची निवासस्थानी भेट देऊन त्यांची समजूत काढली. त्यानंतर आज सकाळी भाजपकडून अधिकृतपणे रासने यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप की त्यांचे बंधू शंकर जगताप यावर तोडगा निघत नव्हता. अखेर अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप