पुणे: चिंतन बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वर्तनावर टीका
पुणे, ता. ०५/०३/२०२३: कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर आज मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घरोघरी जाऊन मतदारांना आभाराचे पत्रक देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण निवडणुकीत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर, नगरसेवकांच्या निष्क्रीयतेवर आणि बूथ प्रमख, शक्ती केंद्र प्रमुखांशी योग्य पद्धतीने संवाद न साधला जात नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत यात सुधारणा होणे आवश्यक आहे, असे ठणकावून सांगितले.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर यासंदर्भात चिंतन करण्यासाठी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची व बूथ प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी हेमंत रासने, माजी सभागृहनेते सुहास कुलकर्णी, विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोंढरे, बाळा शुल्का, मामा देशमुख यांनी त्यांची मते मांडली.
या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केले, त्यांच्या प्रयत्नांमध्ये कुठेही कमी राहिली नाही अशी शब्दात सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करताना प्रत्येकाने आपला पराभव का झाला याचे आत्मचिंतन करावे अशी सूचना करण्यात आली. तसेच निवडणुकीच्या दरम्यान आलेल्या अनुभवावरही या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
पुण्यातील कार्यकर्ते सक्षमपणे काम करत होते. पण बाहेरची यंत्रणा कामाला लावण्यात आले. अनेक पदाधिकारी मतदारसंघात तळागाळात काम न करता फक्त गाड्यांमधून फिरत होते. नगरसेवकांनी पाच वर्षात व्यवस्थित कामे केली असती, नागरिकांची संपर्क ठेवला असता तर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असता, पण हे नगरसेवक पाच वर्ष गाडीच्या काचा वर करूनच प्रभागात फिरले. त्यामुळे प्रचारात मतदारांची नाराजी दिसून आली. प्रभाग १५ मध्ये गांभीर्याने काम करण्यात आले नाही, त्याचा फटका बसला. पक्ष संघटनेत काम करताना पदाधिकाऱ्यांनी बूथ प्रमुखांशी चांगले प्रेमाने बोलले पाहिजे, पण अनेक जण बोलत नाहीत. तळागाळातील कार्यकर्त्यांशी चांगला संवाद असेल तरच पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचवता येतील, असे मतही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला, असे बैठकीत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, हेमंत रासने यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली, प्रत्येकाला आत्मचिंतन करण्यास सांगितले आहे असे त्यांनी सांगितले.
कसब्याची निवडणूक दरवेळी भाजपच्या यंत्रणेच्या हातात असते, पण यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक ताब्यात घेतली. त्यामुळे निवडणुकीत पराभव झाला, असेही मत एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप