पुणे: अखेर आढळराव पाटलांचे ठरले, आज होणार महत्वाची घडामोड
मंचर, २६ मार्च २०२४ : शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात कोण याचं उत्तर अजितदादांना मिळत नव्हतं. एकच नाव होतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. परंतु, आढळराव शिंदे गटात होते. शिरुरची जागा शिंदे गटाला सुटेल याची सूतराम शक्यता नव्हती. दोघांचीही परिस्थिती अशी झाली होती की एकमेकांची मदत घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय, दोन्ही गटांनी विरोध बाजूला सारला आणि आढळरावांचा पक्षप्रवेश नक्की झाला. मिळालेल्या माहितीनुसार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आजच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रे पक्षात प्रवेश करणार आहेत.
याआधी काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. त्यानुसार २६ मार्च रोजी संध्याकाळी शिरूर आंबेगाव परिसरात आढळरावांचा पक्षप्रवेश आणि प्रचाराचा शुभारंभ निश्चित करण्यात आला. आढळराव पाटलांच्या प्रवेशाने त्यांची शिरूरमधील उमेदवारी निश्चित मानली जात आहे का? असा प्रश्न विचारला असता तटकरे म्हणाले होते की, सध्या महायुतीत जागा वाटपांची चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीने आढळराव पाटील राष्ट्रवादीमध्ये येत आहेत तसे काही जण दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात का? यावर तटकरे म्हणाले होते की, महायुतीने ४५ प्लसचा निर्धार केला आहे. काही गोष्टींसाठी वाट बघावी लागते.
आज मी तिन्ही पक्षांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. मला शिवसेनेची परवानगी मिळाली आहे की राष्ट्रवादीतून लढावं. सध्या पाच आमदार आमच्यासोबत आहेत. अजित पवारही प्रचार करणार आहेत. माझी उमेदवारी जाहीर होईल किंवा नाही हा मुद्दा नाही. मात्र मीच महायुतीचा उमेदवार असणार आहे. अजित पवार यांची ताकद माझ्या पाठिशी आहे, असा दावा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी केला.