पुणे: आपचा फुसका बार पोटनिवडणूकीतून माघार
पुणे, १० फेब्रुवारी २०२३: मोठा गाजावाजा करून आम आदमी पक्षाने (आप) कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरला. मात्र त्यांचा निवडणूक लढविण्याचा हा निर्णय घेतल्याने हा फुसकाबार ठरला असून दिल्लीच्या आदेशाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेससह आप, संभाजी ब्रिगेड या पक्षांनी अर्ज भरले होते. चिंचवड मध्ये देखील आपने अर्ज भरलेला होता. मात्र सुचक, अनुमोदक नसल्याने आजच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला. आपने यापूर्वीही पोट विधानसभा निवडणूक लढवली असल्याने त्यांना चांगली मते मिळाली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. आपने आता माघारी घेतल्याने या निवडणुकीत काय होणार? आणि आपची मते भाजपला मिळणार की काँग्रेसला याकडे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या संदर्भात आपने प्रसिद्धीपत्र काढून त्यांची भूमिका स्पष्ट केले आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. महाराष्ट्रातील खोक्या – बोक्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळलेली आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची संगीत खुर्ची राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे. कोणताही प्रस्थापित पक्ष कोणत्याही इतर प्रस्थापित पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतो. कोणतीही वैचारिक भूमिका नाही, हे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. आमदारांनी राजकीय पक्ष बदलण्यासाठी अथवा सत्तेत भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याच्या चर्चा जनसामान्यांमध्ये दररोज घडत आहेत. लोक या प्रकाराला कंटाळले आहेत.
दिल्लीतील वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उत्तम व भ्रष्टाचार रहित प्रशासकीय सेवा यांचे विकासाचे मॉडेल लोकांना मनापासून आवडले आहे. पंजाबमध्ये देखील याच मॉडेलच्या धर्तीवर आम आदमी पक्षाच्या सरकारचं काम सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये लवकरच येतील आणि याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून होईल. सद्या आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप