पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मी पुन्हा येईन नाऱ्यामुळे पवारांची टीका, भाजपचा पलटवार
मुंबई, १६ ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचं भाषण करताना पुन्हा सत्तेत येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्याशी झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते बुधवारी (१६ ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना स्वतःच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही आणि ते मोदींच्या अतित्त्वावर टीका करत आहेत, असा पलटवार केला.
संभाजीपनगर मध्ये पत्रकारांसी बोलताना शरद पवार म्हणाले, “मी पुन्हा येईन असं कितीही जोरात सांगितलं तरी मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल. याचा अर्थ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच लोकांनी यांची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार केलेला दिसत आहे. हे चित्र आगामी निवडणुकीत दिसेल. त्यामुळे यांनी कितीही जोरजोरात सांगितलं की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन तरी मोदींची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल. याबाबत माझ्या मनात शंका नाही. आज सत्तेचा धडाधड गैरवापर सुरू आहे. केंद्र सरकारमध्ये बसलेले घटक अधिकारांचा गैरवापर करून राजकीय पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपल्याला यश मिळणार नाही ही खात्री पटते, तेव्हा या रस्त्याला माणूस जातो.”
मला सध्या देशाचं चित्र मोदी सरकारला अनुकुल दिसत नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा डोळ्यासमोर ठेवा. केरळमध्ये आज भाजपा नाही. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणात भाजपा नाही. महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नव्हतं, ते आता आलं आहे. गोव्यातही भाजपाचं सरकार नव्हतं, तेही अशाच पद्धतीने आणलं. गुजरातमध्ये भाजपाचं सरकार आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचं सरकार पाडलं आणि भाजपा सत्तेत आली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आहे. राजस्थानमध्ये भाजपाचं सरकार नाही. दिल्ली-पंजाबमध्ये भाजपाचं सरकार नाही. उडिशामध्ये भाजपाचं सरकार नाही. झारखंडमध्ये नाही, ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेत नाही.”
शरद पवार यांच्या या टीकेला भाजपते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
बावनकुळे म्हणाले, ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात.
मोदी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे.
समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे.