पोर्सेकार अपघात प्रकरण: डाॅ. तावरेंच्या अटकेमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता
पुणे, २७ मे २०२४ : कल्याणी नगर येथे पोर्से कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचा रक्तगटाचा नमुना अदलाबदल करून त्याला वाचविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. याप्रकारे ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर अजय तावरे यांच्यासह आणखी एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मात्र तावरे यांच्या अटकेमुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. रक्त गटाचे नमुने बदलण्यासाठी तावरे यांना कोणी फोन केला होता? याची चर्चा सुरू झालेली आहे. यात सत्ताधारी पक्षाच्या आमदार व मंत्राचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राज्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.
कल्याणी नगर येथे १९ मेच्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने भरधाव वेगातील पोर्सेच्या धडकेत दोघांचा बळी घेतला. या प्रकरणात आत्तापर्यंत मुलाच्या वडिलांसह आजोबांना देखील अटक झालेली आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याने पबच्या मालकांना देखील अटक झालेली आहे. त्यातच या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा अहवाल ससून रुग्णालयाकडून येण्यास उशीर होत असल्याने काहीतरी गडबड सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज पहाटे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांना बेड्या ठोकल्या आहे. डॉक्टर तावरे यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्तगटाचा नमुना तपासणीसाठी न पाठवता भलत्याच व्यक्तीचे रक्त तपासणीसाठी पाठवावे असे आदेश हाळनोर यांना दिले. हाळनोर यांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमूने कचरा पेटीत टाकून दुसर्याच व्यक्तीचे रक्ताचे नमूने तपासणीला पाठवले. पोलिसांनी यामध्ये सावध भूमिका घेत या अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेऊन ते दुसऱ्या एका प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले तसेच ससून मधून जे बनावट रक्त नमुने पाठवले त्याची डीएनए तपासणी केली असता ते अल्पवयीन आरोपीचे नसल्याचे समोर आले. त्यामुळे या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे.
डॉक्टर तावरे यांना रक्त नमुने बदल करून पाठविण्याचे आदेश एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने दिले होते. तावरे यांना ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदावर बसायचे असल्याने त्यांनी त्या आमदाराचा आदेश मान्य केला तसेच विशाल अग्रवाल याच्या संदर्भात फोनवर तावरे यांनी बोलणे केले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये राज्यातील एका वजनदार मंत्र्याने हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवण्यासाठी धडपड केल्याचेही समोर येत आहे.
कल्याणीनगरचा अपघात हा एकंदरीतच सत्ताधारी भाजपसाठी डोकेदुखीचा प्रकार ठरलेला आहे. त्यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये येऊन हे प्रकरण हाताळले. त्यानंतर तपासाला ही वेगळे वळण आले आहे. त्यातूनच तावरे व हाळनोर यांची अटक झालेली आहे.
या तपासाल समोर सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचे व आमदाराचे कनेक्शन समोर आल्यास राज्यातील राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी दिसतील असे सूत्रांत तसेच सांगण्यात आले आहे.