गणेशोत्सवात ‘अफलज खान वध’ देखावा साकारण्यासाठी पोलिसांनी नाकारली परवानगी 

पुणे, २२ ऑगस्ट २०२२: नुकत्याच झालेल्या दहिहंडी उत्सवात मुंबईमध्ये गोविंदा पथकाने ‘अफझल खानाचा वध’ हा देखावा सादर केल्याची घटना ताजी असतानाच, आगामी गणेशोत्सवात ‘अफजल खानाचा वध’ या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यास पुण्यातील कोथरूड येथील एका गणेश मंडळास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारण्याची भुमिका घेतली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे जाणार असल्याचेही उघड झाले आहे.

 

कोथरुड गावठाण येथील संगम तरुण मंडळ ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सवसमंडळ यंदा ५६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. संबंधित मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना व प्रसंगावर आधारीत देखावा सादर केला जातो. यावेळी मंडळाने गणेशोत्सवासाठी ‘अफजलखानाचा वध’ या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र कोथरुड पोलिसांना ११ ऑगस्ट रोजी पाठविले होते. दरम्यान, संबंधित पत्राची दखल कोथरुड पोलिसांनी घेतली. त्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र मंडळाचे अध्यक्ष ऍड.किशोर शिंदे यांना कोथरुड पोलिसांनी पाठविले.

 

मंडळ देखावा सादर करण्यावर ठाम

पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरीही मंडळाकडून मात्र हा देखावा सादर करण्यात येणार असल्याचे ऍड.शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे म्हणाले,”” आम्ही मागील २० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील घटना व प्रसंगावर आधारीत देखावे सादर केले आहेत. यावर्षी आम्ही ‘अफजलखानाचा वध’ हा देखावा सादर करणार आहोत. पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही आम्ही देखावा सादर करणार आहोत.”

 

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणार दाद

 

या प्रकरणी मंडळाकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली जाणार आहे. मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी सोमवारी मुंबईला जाणार असून ते मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे हा प्रश्‍न मांडणार आहेत. त्यामुळे दोघेही नेमकी काय भुमिका घेतील, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

 

“मंडळाने आमच्याकडे परवानगी मागितली होती. त्यांचा देखकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित देखावा सादर करु नये, असे मंडळाला आम्ही कळविले आहे.” – महेंद्र जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरुड पोलिस ठाणे