भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर – ओबीसी मेळाव्याला पंकजा मुंडे यांना जाण्यापासून रोखले
बीड, १८ नोव्हेंबर २०२३: शुक्रवारी जालन्यात अजित पवार गटाचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मेळावा पार पडला. या सभेत सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. सभेतून बोलताना छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचा इशारा राज्य सरकारला दिला. मात्र, या मेळाव्याला भाजपा नेत्या पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यासंदर्भात खुद्द पंकजा मुंडेंनी रात्री आपली बाजू व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे.
जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या बॅनर्सवर पंकजा मुंडेंचे फोटोही झळकले होते. त्यामुळे सकाळपासूनच छगन भुजबळांप्रमाणेच पंकजा मुंडे यांच्याही भाषणाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. पंकजा मुंडे ओबीसींच्या सर्वपक्षीय मेळाव्यातून नेमकी काय भूमिका मांडणार? याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, प्रत्यक्ष मेळाव्यात भाजपाकडून इतर नेते उपस्थित राहिले. पंकजा मुंडेंनी ऐनवेळी अनुपस्थित राहण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येऊ लागला. या पार्श्वभूमीवर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना पंकजा मुंडेंनी त्याचं कारण सांगितलं आहे.
यासंदर्भात बोलताना पंकजा मुंडेंनी भाजपाकडून इतर नेत्यांना तिथे पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपण तिथे गेलो नाही, असं सांगितलं आहे. “मी ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय कार्यक्रमाला अपेक्षित होते. कारण माझे फोटो बॅनरवर होते. त्यामुळे लोकांना वाटत होतं की मी तिथे उपस्थित राहणार आहे. पण प्रत्येक पक्षानं कोणत्या नेत्यांना पाठवायचं याचा निर्णय घेतला. त्यानुसार आमच्या पक्षाकडून आशिष देशमुख, देवयानी फरांदे व डॉ. महात्मे यांना पाठवलं होतं. ते त्या कार्यक्रमाला गेल्यामुळे मी तिथे गेले नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मला वाटलं मी या विषयावर गेल्या अनेक वर्षांत अनेक कार्यक्रमांत व्यक्त झाले आहे. ती खेळपट्टी छगन भुजबळांची होती. त्यांनी बॅटिंग करावी असं वाटलं, तशी त्यांनी ती केली आहे”, अशा शब्दांत त्यांनी छगन भुजबळांच्या भाषणाला दाद दिली.
“पंढरपूरचा राजा यादव कुळातल्या कृष्णाचा अवतार, म्हणजे ओबीसी, देवाला जात…”; छगन भुजबळांचं जरांगे पाटलांना जोरदार उत्तर
दरम्यान, बॅनर्सवर फोटो असले, तरी मेळाव्याचं निमंत्रण नसल्यामुळे पंकजा मुंडे तिथे गेल्या नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येऊ लागला होता. मात्र, ही बाब मुंडे यांनी फेटाळून लावली आहे. “ओबीसींच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण, मानपानाची कोणतीही आवश्यकता नाही. पण मी या विषयावर इतक्या वेळा व्यक्त झालेय की आता त्यात नावीन्य असण्याची गरज नाही. माझी भूमिका स्वयंस्पष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे”, असं त्या म्हणाल्या.