पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले: सुधीर मुनगुंटीवार यांची टीका
संभाजीनगर, १५ सप्टेंबर २०२३: छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले आणि त्या लोकांनी आमच्यावर टीका करायची?
मुनगंटीवार म्हणाले की नाना पटोलेंच्या आरोपांमध्ये काही गंभीरता असते का? ते म्हणतात की मुख्यमंत्री फाईव्ह स्टारला उतरले. मग आता इंडिया आघाडीच्या बैठकीला मुंबईत आलेले मुख्यमंत्री कुठं उतरले? सह्याद्रीला उतरले का? पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले आणि त्या लोकांनी आमच्यावर टीका करायची? फक्त शौक करण्यासाठी विमान पाठवले होते. इथं मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृतमहोत्सवासाठी लोक येत आहेत.
ममता बॅनर्जी सरकारी विमानाने मोदी हटाव म्हणून आल्या आणि थांबल्या कुठं? केजरीवाल कुठं थांबले? मान कुठं थांबले? त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला आम्ही बांधील नाहीत. ते काहीही बोलतात. सत्ता गेल्याने आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभती आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचे भाष्य अशाच पद्धतीचे आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
दरम्यान, राज्यातील येड्यांच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली आहे. शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात परिस्थिती एवढी गंभीर असताना मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीवर करोडो रुपये खर्च करणे म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, स्वत:ला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात गेंड्याच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका पटोलेंनी केली होती.