औरंगजेबाच्या मुद्द्यावरून ओविसींची भाजपवर कडाडून टीका

संभाजीनगर, १२ जून २०२३ : मुघल बादशाह औरंगजेब आणि टिपू सुलतानवरून देशभरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे पोस्टर आणि सोशल मीडिया स्टेटसवरून महाराष्ट्रात राडे झाले. त्यापाठोपाठ टिपू सुलतानवरून कर्नाटकसह दक्षिण भारतात राजकारण सुरू आहे. याचदरम्यान, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओवैसी म्हणाले, भारतात इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं मुघलांवर प्रेम नाही, परंतु इतिहास बदलला जातोय. असं वाटू लागलं आहे की, लाल किल्ला मोदींनीच बांधला आहे.

ओवैसी म्हणाले, तुमच्याकडे टिपू सुलतानचा फोटो असेल तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. परंतु त्याच टिपू सुलतानचा फोटो भारताच्या संविधानात आहे. औरंगजेबाबद्दल ओवैसी म्हणाले तुम्ही आधी औरंगजेबाच्या फोटोची पुष्टी करा. औरंगजेब ३०० वर्षांपूर्वी मेला आहे. तुम्ही कसं काय म्हणू शकता की हा फोटो औरंगजेबाचा आहे. बाबरी मशिदीचा विरोध करताना हे लोक आम्हाला बाबरच्या औलादी म्हणायचे, आता हेच लोक आम्हाला औरंगजेबाची औलाद म्हणू लागले आहेत.

ओवैसी यांनी सध्याच्या मोदी सरकारची हिटलरच्या जर्मनीशी तुलना केली आहे. ते म्हणाले आम्ही भारतात १९३० मधला जर्मनी पाहत आहोत. अशाच प्रकारे तिथे ज्यू लोकांविरोधात द्वेषपूर्ण भाषणे दिली जात होती. हिटलरच्या राजवटीतही प्रोपगंडावाले चित्रपट बनवले गेले आणि आज काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरीसारखे चित्रपट भारतात बनत आहेत, दाखवले जात आहेत.
एआयएमआयएम नेते ओवैसी यांनी आरोप केला आहे की, गेल्या ९ वर्षात (मोदी सरकारचा कार्यकाळ) गोमांस, हिजाब आणि हलालच्या नावावर मॉब लिंचिंगची प्रकरणं झाली. उत्तराखंडमधील अल्पसंख्याकांना घरं खाली करायला लावली. त्यापैकी एक भाजपाचा अल्पसंख्याक नेतादेखील होता.