मोदींना रोखण्यासाठी विरोधक देश विरोधी शक्तींचाही मदत घेतील – उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य
पुणे, १५ जून २०२३ः आगामी लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी विरोधी पक्षाचे नेते देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करतील. ते भारत विरोधी शक्तीची मदतही घेतील, असा धक्कादायक आरोप करत, ‘‘जनतेची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून, आम्ही ३५० पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू,’’ असा दावा उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केला.
केशवप्रसाद मौर्य हे पुणे दौऱ्यावर असून, त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी यावेळी उपस्थित होते.
मौर्य म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात महिला, शेतकरी, तरून यासह सर्वच क्षेत्रात चांगले काम केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी भाजपचे २८० नेते देशातील सर्व लोकसभा मतदारसंघात जात आहेत. मोदींच्या नेतृत्वामुळे भारताला ‘जी २०’चे अध्यक्षपद मिळाले आहे, आपला देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. त्यामुळे जगभरात भारतीयांची शान वाढली आहे. दहशतवादी हल्ले, नक्षली हल्ले बंद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून टाकले. काँग्रेसच्या राजवटीत २०१४ पूर्वी निराशेच्या गर्तेत गेलेल्या भारताला मोदींनी आत्मविश्वास दिला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर प्रदेशात ७५ पेक्षा जास्त तर महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून येतील. देशात आमचे ३५० पेक्षा जास्त खासदार असतील असा मला विश्वास आहे, असे मौर्य यांनी सांगितले.
समान नागरी कायदा आणणार
भाजपच्या जाहीरनाम्यात ३७० कलम हटविणे, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणे आणि समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटविले आहे. राम मंदिराचे बांधकाम वेगात सुरू आहे. समान नागरी कायदा आम्ही आणणार आहोत. २२व्या कायदा आयोगाने यासंदर्भात नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या आहेत, त्यामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असे मौर्य यांनी सांगितले.
ब्रिजभूषन सिंह बद्दल थेट उत्तर टाळले
उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषन सिंह यांच्याविरोधात आॅलंपीक पदक विजेत्या महिला खेळाडूंनी लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, पण अद्याप अटक झालेली नाही, त्याबद्दल विचारले असता मौर्य म्हणाले, ‘‘कुस्तीपट्टूंबद्दल, मुलींबद्दल आम्हाला आदर आहे. पण याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत बोलता येईल. कोणी आरोप केले म्हणजे लगेच अटक झाली पाहिजे असे नाही.