विरोधी पक्ष, संघटनांकडून १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक

पुणे, ७ डिसेंबर २०२२: छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल भाजपचे नेते वारंवार वादग्रस्त विधान करत असले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात १३ डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. यासंदर्भात विरोधी पक्ष, समविचारी संघटनांची एसएसपीएम महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

संभाजी ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जनता दल, आंबेडकर चळवळीतील संघटनांचा पाठिंबा आहे.
राज्यपाल भगतसिंह कोशारी हे वादग्रस्त वक्तव्य करत शिवाजी महाराज व इतर महापुरूषांचा वारंवार अवमान करत आहेत. प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा व रावसाहेब दानवे यांनीही वक्तव्य केले आहेत.
हे प्रकार वारंवार होत असल्याने शिवप्रेमी शांत बसणार नाहीत. म्हणून या सगळ्यांची हकालपट्टी करावी. यांच्यावर कठोर शासन करावे अशी भूमिका बैठकीत उपस्थितांनी मांडली. त्यामुळे शिवप्रेमी नागिकांच्यावतीने च्या १३ डिसेंबर रोजी पुणे बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी दिली.

या बैठकीस अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, संजय मोरे, गजानन थरकुडे, बाळासाहेब अमराळे, सचिन आडेकर, अविनाश मोहिते, रवींद्र माळवदकर आदी उपस्थित होते.