“नोव्हेंबर गेला, वर्ष संपलं, जानेवारीचा मुहूर्तही हुकला, पण वाघनखं येईनात” – काँग्रेसचा सुधीर मुनगंटीवारांना खोचक टोला
मुंबई, ६ जानेवारी २०२४: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला होता. शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधासाठी वाघनख हे शस्त्र वापरलं होतं. हे शस्त्र सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयात आहे. शिवरायांनी अफझल खानाच्या वधासाठी वापरलेलं वाघनख भारतात आणलं जाणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी वाघनख भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाशी करार करण्यासाठी लंडनला गेले होते. सप्टेंबर महिन्याच्या (२०२३) अखेरीस मोठा गाजावाजा करून लंडनला गेलेली ही सगळी मंडळी वाघनख न घेता ११ ऑक्टोबर रोजी परत आली.
सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं नोव्हेंबर महिन्यात हे शस्त्र भारतात येईल. परंतु, आता डिसेंबर संपून जानेवारी महिन्यातला एक आठवडा उलटला तरी वाघनख भारतात आलेलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षातले नेते मुनगंटीवार यांच्यावर टीका करत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की नोव्हेंबर गेला, जानेवारीसुद्धा हुकला, सुधीरभाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली?
वडेट्टीवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मोठ्या थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून, सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेलात. येताना मात्र रिकाम्या हाताने परत आलात. त्यानंतर वाघनखं नोव्हेंबरमध्ये येणार असं तुम्ही सांगितलं, तो महिना गेला… वर्षही संपले, २०२४ उजाडले…आता जानेवारीपण हुकला! वाघनखं काही आली नाहीत… आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार?
वाघनख महाराष्ट्रात येण्यास मे उजाडणार?
दरम्यान, कायदेशीर प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे वाघनखं महाराष्ट्रात येण्यास आता मे महिना उजाडेल, असं सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. जानेवारीतही ही वाघनखे येणार नाहीत. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च किंवा एप्रिलमध्ये वस्तुसंग्रहालयाशी राज्य सरकारचा करार होईल आणि मे अखेरीपर्यंत ती मुंबईत येतील, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही वाघनखे आणण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याची गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली असून सध्या हे प्रकरण परराष्ट्र खात्याच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. वस्तुसंग्रहालयाकडूनही ब्रिटिश सरकारच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकार व ब्रिटिश सरकारच्या मंजुऱ्या मिळाल्यानंतर यासंदर्भातील करार होणार आहे.