पवार, ठाकरेनी नाही तर तिसऱ्याच नेत्याने संजय राऊतांना काढले जेल बाहेर

मुंबई, ५ मे २०२३ ः ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे तीन महिने जेलमध्ये राहून आले. इडीच्या तावडीतून त्यांना उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी सोडविले अशी चर्चा असली तरी प्रत्यक्षात या दोन नेत्यांपेक्षा त्यांच्या भावाने जिवाचे रान केले होते, असे खुद्द राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

काही दिवसांपूर्वी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कथित पत्राचाळ घोटाळ्यात अटक केली होती. संजय राऊतांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे त्यांची लवकर सुटका होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, संजय राऊत १०४ दिवसांत तुरुंगातून बाहेर आले. ईडीने कारवाई केलेल्या इतर कोणत्याही राजकीय नेत्यांच्या तुलनेत संजय राऊत सगळ्यात आधी तुरुंगातून बाहेर आले. त्यामुळे त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात कुणाचा हात होता? याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. संजय राऊत यांचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या मदतीमुळेच संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले असावेत, असं बोललं जात आहे.

पण राऊतांना तुरुंगातून कुणी सोडवलं? त्यांच्यासाठी कायदेशीर लढाई कुणी लढली? याबाबत संजय राऊतांनी स्वत: खुलासा केला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. ईडीची कारवाई आणि तुरुंगातून सुटकेबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “आतापर्यंत देशभरात ईडीकडून केलेल्या कारवायांमध्ये फक्त तीन महिन्यांत तुरुंगातून बाहेर आलेला एकमेव माणूस मी आहे. मी निष्कलंकपणे बाहेर आलोय, कोर्टाने माझी अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.”

तुरुंगातून बाहेर काढण्यात कोणत्या नेत्याचा सहभाग होता. यावर भाष्य करताना संजय राऊतांनी तुरुंगातून बाहेर काढण्याचं सर्व श्रेय आपला भाऊ आणि ठाकरे गटाचा आमदार सुनील राऊत यांना दिलं. यावेळी राऊत म्हणाले, “मी साडे तीन महिने तुरुंगात राहिलो, सुनील राऊत मला १०० टक्के तुरुंगातून बाहेर काढणार, याची मला खात्री होती. सुनील बाहेर काय करतोय, याची माहिती मी घेत असे. त्याची मेहनत मी पाहत होतो. जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो, तेव्हा मी उद्धव ठाकरेंना भेटलो. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, संजय तू सुनीलमुळे बाहेर आलाय. त्यानंतर मी शरद पवारांकडे गेलो, तेव्हा शरद पवारही म्हणाले, तू बाहेर आलास ही सुनील राऊतची मेहनत आहे. हे खरं आहे की, ज्या पद्धतीने सुनील बाहेर कायदेशीर लढाई लढत होता, ती मलाही कधी जमली नसती.”

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप