एकही उद्योग बाहेर गेला नाही, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले हे विरोधकांचं खोटं कथानक – देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई, ३ जुलै २०२४ : राज्यातील उद्योग बाहेर गेले, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने महायुती सरकारवर केली जातेय. त्या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना फडणवीस यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, एकही उद्योग मुंबईच्या हबमधून बाहेर गेलेला नाही. एकही हिरे व्यापारी मुंबईतून बाहरे जाणार नाहीत. सुरतमधून केवळ १२ टक्के हिरे निर्यात होतात, तर ७५ टक्के हिरे मुंबईतून निर्यात होतात. उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
‘गेल इंडिया’चा उद्योग गेल्याचं सांगितलं जातं. आपण त्यांना कोणत्याही सवलती दिल्या नव्हत्या. तशी बोलणी झाली नव्हती. त्यांची इतर सात आठ राज्यात चाचपणी केली. त्यांची मध्य प्रदेश सरकारशी बोलणी सुरू आहे. मात्र, त्यांची गुंतवणूक गेली असे नाही. त्यांच्या दुसऱ्या प्रोजेक्टचा प्रस्ताव आपल्याकडे आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला जाऊन त्यांनी मोठी गुंतवणूक आणली. जानेवारी २०२३ मध्ये, आम्ही १ लाख ३७ कोटी रुपयांचे एओयू (सामंजस्य करार) केले. यातील ८० टक्के एमओयूवर कारवाई करण्यात आली आहे. गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. जानेवारी २०२४ मध्ये आम्ही २ लाख ९८ हजार ७९१ कोटी रुपयांचे २३ करार केले आहेत. गुंतवणूक केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात येत आहे, असंही ते म्हणाले.
एजंटला बळी पडू नका – फडणवीस
लाडकी बहिण योजनेबाबत मी सर्व भगिनींना विनंती करतो की एजंटला बळी पडू नका. कोणी एजंट येत असेल तर तक्रार करा. काल अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतून काढून टाकलं. सस्पेंड केलं. त्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा विचार सरकार करत आहे. सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म ५० रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. यावर जर सेतू केंद्राने जास्त पैसे घेतले तर त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल, असंही फडणवीस म्हणाले.