जे सोडून गेले त्यांची चिंता नाही – शरद पवारांनी बंडखोरी विरोधात दंड थोपटले

पुणे, २ जुलै २०२३ : ‘ जे कोणी सोडून गेले, त्यांची मला चिंता नाही. माझा महाराष्ट्रातील जनतेवर आणि युवकांवर विश्‍वास आहे,‘‘ असे सांगून ‘ उद्या कऱ्हाडला जाऊन स्व यशवंतराव चव्हण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राज्यात आणि देशात जावून जास्तीत जास्त लोकांची भेट घेणार आहे, तेवढे एकच काम मी करणार आहे आणि हीच माझी पुढची रणनिती असणार आहे,’ असे सांगत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले. ‘आता जे गेले आहेत, त्यांच्या भविष्याची मला काळजी वाटते,’’ असा अप्रत्यक्ष दमही त्यांनी यावेळी भरला.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी भाजपला पाठींबा देत सत्तेत सहभागी घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर पुण्यात पवार यांनी पक्षाची भूमिका आणि पुढील रणनिती यांच्यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी आमदार राेहित पवार, प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भष्ट्राचारामध्ये सापडलेला पक्ष आहे, असे आरोप होता. त्यांचा संदर्भ देत पवार म्हणाले,‘‘ पक्षावर आणि पक्षातील ज्या नेत्यांवर पंतप्रधान यांनी आरोप केले होते. आज विधीमंडळातील त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांना मंत्रीमंडळात शपथ देऊन या आरोपात तथ्य नाही. या आरोपातून पक्षाची आणि त्या नेत्यांनी त्यांनी मुक्त केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,’’ असा टोलाही त्यांनी यावेळी मोदी यांना लगाविला.
वेगळी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करणार
सहा तारखेला महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मी बैठक बोलविली होती. त्यामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा विचार होता. परंतु त्या पूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली. त्यांच्याबाबत काही निर्णय घ्यावयाचा, याबाबत पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नेमके किती संख्या आहे. यांची मला कल्पना नाही. परंतु लवकरच ती समोर येईल. ज्यांची नावे समोर आली आहेत, त्यापैकी काही जणांनी संपर्क साधून ‘साहेब’ आम्ही तुमच्या बरोबरच आहे, असे कळविले आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांना पक्ष संघटनेत पद दिले होते. त्यांना या सर्व प्रकारांची कल्पना असली पाहिजे होती, असेल तर त्यांनी योग्य वेळी का पावले उचलली नाहीत, यांचे मला खेद वाटतो, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

आजचा प्रकार इतरांना नवीन असले, मात्र मला नवीन नाही, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘१९८० मध्ये मी ज्या पक्षाचे नेतृत्व करीत होतो. त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यानंतर महिन्याभराने सहा आमदारांना व्यतिरीक्त सगळे आमदार मला सोडून गेले. तेव्हा पाच लोकांना घेऊन मी महाराष्टात पक्षबांधणी केली. पुढच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले, त्यापैकी दोन -तीन जण सोडल्यास सगळे आमदार पराभूत झाले. १९८० मध्ये जे चित्र दिसले, ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल, हा एककलमी कार्यक्रम माझा राहिल. राज्यातील तरूणांवर आणि जनतेवर माझा प्रचंड विश्‍वास आहे. चार वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभेत हेच चित्र होते. पण राज्यात जिथे जाता येईल, तिथे जाणे, आपली भूमिका मांडण्याचे काम मी केले. त्याचा परिणाम आमची संख्या वाढली आणि आगाडीचे सरकारही आले.’’ तर राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर विचारले असता पवार म्हणाले,‘‘ आधी किती लोक राहिले आहेत, हे पाहू द्या. मग दुसरी टीम कुठली आहे, त्याचा विचार करू.’’
कोणी काहीही दावा करो, जनतेसमोर जाणार
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आमचाच असल्या दावा केला आहे, त्यावर विचारले असता पवार म्हणाले,‘ कोणी कितीही दावा केला, तरी माझा जनतेवर विश्‍वास आहे. तेच ठरवतील. संख्याबळ किती आहे, हे मी आता सांगू शकत नाही. पक्ष फुटला, घर फुटले असे अजिबात वाटत नाही, कारण प्रश्‍न घराचा नाही, तर जनतेचा आहे. पक्ष बांधणी करणे हेच माझे टार्गेट आहे.’’

आता नव्या नेतृत्वाची पिढीला संधी देता येईल. माझी नाराजी कोण बद्दल नाही, मी कोणालाही थांबविण्याचा प्रयत्न केला नाही, असेही पवार म्हणाले. सत्तेत सहभागी जे झाले आहेत, त्यांचा यातून शंभर टक्के फायदा होईल असे मला वाटत नााही. करण जनता सर्व काही ठरवते, असेही त्यांनी एका प्रश्‍ना उत्तर देताना सांगितले.

राजीनामा मागे घेण्याचा निर्णय योग्यच

पवार यांनी मध्यंतरी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. एका प्रश्‍नाच्या अनुषंगाने त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले,‘‘ मी राजीनामा परत घेण्याचा निर्णय बरोबरच होता, असे आता मला वाटते आहे.’’ महविकास आघाडीवर या घटनेच्या परिणामाबाबत बोलताना पवार म्हणाले,‘‘ महाविकास आघाडी कायम राहणार आहे. माझी दूरध्वनीवरून सर्वांशी चर्चा झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर सुध्दा आक्रमकपणे जाव, अशी आमची भूमिका आहे.’’

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेत सहभागी होण्याच्या आणि मंत्रीपदे मिळविण्यावर पवार म्हणाले,‘‘ मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजपतील ज्या आमदारांना मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा वाटत होती. त्यासर्वांची यामुळे निराशा झाली आहे. त्यांची मला काळजी वाटते, असा टोलाही त्यांनी यावेळी मारला.

पक्षाचा आश्‍वासक चेहरा शरद पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि चिन्हावर दाव्याबाबत विचारले असता पवार म्हणाले,‘‘ चिन्हाला काही होणार नाही. चिन्हावर काहीही नसते. मी १४ वेळा निवडणूका लढविल्या. तेही वेगवेगळी चिन्हे घेऊन निवडणूका लढविल्या. तेव्हा जनतेला मला निवडून दिले. त्यामुळे चिन्हा पेक्षा माझा जनतेवर जास्त विश्‍वास आहे.’’ तर पक्षाचा येथून पुढे आश्‍वासक चेहरा कोण असणार, असे विचारले असता पवार म्हणाले,‘‘ शरद पवार’’.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप