राज्याच्या गृहखात्यासह महसूल विभागात सुधारणेची गरज – हेमंत पाटील
मुंबई, ४ जानेवारी २०२५: राज्यातील जनतेने पुर्ण बहुमताने निवडून दिलेल्या सरकारला आता सर्व विभागांमध्ये आमूलाग्र सुधारणा करीत अधिकाधिक लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.४) व्यक्त केले. गृहखात्यासह महसूल विभागामध्ये सुधारणेला बराचा वाव असल्याचे पुढे बोलतांना पाटील म्हणाले.
पोलीस दलावरील प्रशासनाची पकड सैल झाली आहे.सर्वसामान्यांच्या तक्रारीची दखल पोलिसांकडून घेतली जात नाही. अनेक खोटे गुन्हे दाखल करून सर्वसामान्यांना त्रास दिला जातोय. विशेष म्हणजे खरे गुन्हेगार ‘व्हाईट कॉलर’ घालून मोकाट सुटले आहेत. प्रत्येक तक्रारीची योग्य प्रकारे शहानिहा होणे आवश्यक आहे. पोलीस यंत्रणा योग्यप्रकारे कार्य केले, तर संतोष देशमुख हत्याकांडाप्रमाणे इतर गुन्हे घडणार नाही, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.पोलीस यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्या राज्यातील ‘वाल्मिक कराड’ सारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची गरज असल्याचे देखील पाटील म्हणाले.
महसूल खात्यात ‘लाचखोरी’ ही मोठी समस्या आहे. परंतु, राज्याला मोठ्याप्रमाणात महसूल मिळवून देण्याचे कार्य या खात्याकडून केले जाते. अशात या खात्यावरील लोकसेवकांची पकड आणखी घट्ट करीत भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे, असे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषधी प्रशासनासह इतर महत्वांच्या खात्यांचा देखील राज्याच्या महसूल वाढीच्या दिशेने खांदापाट करण्याची आवश्यकता असल्याचे मत पाटील म्हणाले. राज्यातील सर्व विभागांना लोकाभिमुख करीत सर्वसामान्यांसाठी उपयुक्त करावे, अन्यथा एक जनआंदोलन उभे करीत मंत्रालयासमोर आंदोलन करू, असा इशारा पाटील यांनी सरकारला दिला आहे.