नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा, रात्री मुक्काम
पुणे, २९ एप्रिल २०२४: राजकीयदृष्ट्या “व्हायब्रंट’ असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा निवडणूक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २९) सभा होत आहे. गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार, याविषयी राजकीय क्षेत्रासह मतदारांमध्येही उत्सुकता ताणली आहे. सभा झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुण्यात राजभवन येथे मुक्कामी असणार आहेत.
मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मागील वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात दोनदा दौरे झाले आहेत. त्यानंतर ते आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर येत आहेत. या सभेच्या निमित्ताने महायुतीनेही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. कराड येथील सभा संपवून मोदी सायंकाळी साडे पाच वाजता हेलिकॉप्टरने रेसकोर्स येथील सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
सभेनंतर मोदी यांचा राजभवन येथे मुक्काम असणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी निमंत्रितांना भेटणार आहेत का ? याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या सभेसाठी दीड ते दोन लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ३५ हजार लोकांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने, बस यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे व शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली.