नाना पटोले म्हणाले शिंदे फडणवीस पवार सरकार पेक्षा महाविकास आघाडीचे सरकार चांगले
मुंबई, १६ सप्टेंबर २०२३: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला. राज्यातील गुंतणवणूक व रोजगार निर्मितीत मविआ सरकारने फडणवीस व शिंदे सरकारपेक्षा सरस कामगिरी केली आहे. स्वतःची पापं झाकण्यासाठी उठसूट मविआ सरकारवर टीका करणाऱ्या भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारला मोठी चपराक आहे, अशी घणाघाती टीका पटोले यांनी केली.
माहितीच्या अधिकारात जी माहिती मिळाली ती पाहिली तर मविआ सरकारची कामगिरी उत्कृष्टच होती. या सरकारच्या ३० महिन्यांच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात १८ लाख ६८ हजार ५५ नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग स्थापन झाले. तत्कालीन फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या स्थापन झालेल्या १४ लाख १६ हजार २२४ पेक्षा जास्त आहेत.
रोजगाराच्या आघाडीवरही मविआ सरकारच्या ३० महिन्यांच्या काळात ८८ लाख ४८ हजार ९०५ नोकऱ्या निर्माण झाल्या. हे प्रमाणही फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील नोकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. मविआ सरकार पाडल्यानंतर नवीन उद्योगांची संख्या ८ लाख ९४ हजार ६७४ वरून ७ लाख ३४ हजार ९५६ वर घसरली आणि नवीन रोजगाराच्या संधी देखील ४२ लाख ३६ हजार ४३६ वरून २४ लाख ९४ हजार ६९१ एवढी कमी झाली. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा कोरोना महामारीचे संकट होते. तेव्हा राज्यात ६ लाख २१ हजार २९६ नवीन उद्योगांची नोंदणी झाली होती. या माध्यमातून राज्यात जवळपास ४४ लाख ६० हजार रोजगार निर्मिती झाली, असे पटोले म्हणाले.
मविआ सरकारच्या काळात कोरोना संकटात दोन वर्षे गेली. या काळातच भाजपने केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यपालांच्या मदतीने सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले. सरकारला अडचणीत आणण्याचे बदनाम करण्याचेही प्रयत्न झाले. मोदी सरकारनेही मविआ सरकारला कोणतीच मदत केली नाही. विरोधकांचे सरकार म्हणून कायमच अडवणूक केली. या संकटातही चांगली कामगिरी मविआ सरकारने केली. बोलघेवड्या शिंदे फडणवीसांनी मविआ सरकारवर कितीही टीका केली तरी महाविकास आघाडीच्या सरकारने यांच्या अनैतिक सरकारपेक्षा उत्तम कामगिरी केली, असे पटोले म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप