शरद पवारांवर टीका करणाऱ्या नामदेव जाधवांचा जिजाऊंशी काही संबंध नाही; माँ जिजाऊंची वंशज रिंगणात

पुणे, १३ नोव्हेंबर २०२३: नामदेव जाधव यांचा सिंदखेडच्या लखोजीराव जाधव आणि माँ जिजाऊंशी कुठलाही संबंध नाही. ते तोतया आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करत सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांचे वंशज राजे गोपाल भगवानराव जाधव यांनीही लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे वंशज म्हटले जाणाऱ्या नामदेव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नामदेव जाधव यांनी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. शरद पवार यांनीच मुख्यमंत्री असताना मराठ्यांचे आरक्षण घालवले. तेच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. इतकेच नाही तर शरद पवार हे स्वतः ओबीसी आहेत. त्यांना आम्ही मराठ्यांचे नेते समजत होतो, पण ते ओबीसी आहेत, असा दावाही जाधव यांनी केला होता.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नामदेव जाधवांविरोधात आक्रमक झाला आहे. जाधव यांच्याविरोधात लोणीकंद पोलीस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता नामदेव जाधव यांचा सिंदखेडच्या लखोजीराव जाधव आणि माँ जिजाऊंशी कुठलाही संबंध नाही. ते तोतया आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करत सिंदखेड राजा येथील लखोजीराव जाधव यांचे वंशज राजे गोपाल भगवानराव जाधव यांनीही नामदेव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उद्देशून त्यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ध्या नामदेवराव जाधव नावाचा व्यक्ती सोशल मिडीयावर राजमाता जिजाऊंचे वंशज म्हणून मिरवत आहे. मात्र तो वंशज नसून तो केवळ जाधव आडनावाचा व्यक्ती आहे. त्याचा वंशावळीमध्ये देखईल उल्लेख नाही.

नामदेव जाधव यांचा लखोजीराव जाधव आणि माँ जिजाऊंशी कुठलाही संबंध नसून ते तोतया आहेत. तो केवळ प्रसिद्धीसाठी हे करत आहे. पवारांवर टीका करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. कारण यामुळे आम्ही खरे वंशज असलेल्या लोकांची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या समर्थनार्थ आणि या नामदेव जाधवांविरोधात लखोजीराव जाधवांचे वंशज मैदानात उतरले असल्याचे चित्र आहे.