माझा निधी चंद्रकांत पाटीलांनी पळवला – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
पुणे, २९ ऑगस्ट २०२३: कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अचानकपणे पर्वती मतदार संघात वळवला आहे, असा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
निधी वळविण्याच्या प्रकाराबाबत धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. धंगेकर म्हणाले, “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. रस्ते, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक, शौचालय दुरुस्ती, फुटपाथ, विसर्जन घाट, उद्यान विकास अशी जवळपास १०० विकासकामे प्रस्तावित होती. २० डिसेंबर २०२२ रोजी नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही कामे मंजूर होऊन त्यासाठी १० कोटींचा निधी मान्य करण्यात आला होता. “
“दरम्यान, २७ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय शुध्दीपत्रक काढून हा निधी कसबा मतदारसंघातील कामांऐवजी पर्वती मतदार संघामध्ये वळवण्यात आला. विकासकामामधे सत्ताधारी राजकारण करू पाहत आहे. कसब्यातील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षातील आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाकडून हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. कसबा मतदार संघाला जाणीवपूर्वक डावलण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेवर होणारा अन्याय आम्ही कधीच सहन करणार नाही. या शासन निर्णयात बदल करुन कसबा मतदार संघाचा निधी परत द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत,” असेही धंगेकर यांनी सांगितले.
निधी वळविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची कुरघोडी, उद्यापासून कार्यक्रमस्थळी आंदोलन करणार निवडणुकीनंतर आम्ही समाजकारण करतो, मात्र चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदार संघातील विविध कामांसाठी आलेला निधी या मतदारसंघासाठी न करता तो दुसऱ्या मतदारसंघाकडे वळविला आहे. निधी वळविण्याचा हा प्रकार म्हणजे कसबा मतदार संघातील मतदारांचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
चंद्रकांत पाटील जिथे कार्यक्रमाला जातील, तिथे तिथे जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. पाटील यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच उच्च न्यायालयात देखील या प्रकरणाची तक्रार दाखल करणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.