महापालिका निवडणुक नोव्हेंबरमध्ये?

पुणे, ७ सप्टेंबर २०२२: पुणे महापालिकेसह (Pune Municipal Corporation) राज्यातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) नोव्हेंबरअखेरीस होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपने (BJP)ही शक्यता गृहीत धरून निवडणुकांची तयारी सुरू केल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-भाजप सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत महापालिकांतील नगरसेवकांच्या संख्येत महत्त्वपूर्ण बदल केले होते. राज्य सरकारने नव्याने केलेल्या बदलांचा

अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडूनही (Election Commission) राज्यातील

२३ महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्या-त्या ठिकाणी सुरू असलेली निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्याचे

आदेश देण्यात आले आहेत़

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल असून, त्यावर सप्टेंबर

अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल, अशी

शक्यता आहे. या सुनावणीत निवडणुका कधी घ्यायच्या यावर निर्णय होईल

आणि त्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. मुंबई-

पुण्यासह राज्यातील ११ महापालिकांची मुदत १५ मार्च रोजी संपली आहे. ही

मुदत संपूनही येत्या १५ सप्टेंबर रोजी सहा महिने पूर्ण होत आहेत. घटनात्मक

खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार सहा महिन्यांहून अधिक काळ

प्रशासकामार्फत कारभार पाहता येणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून

मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याचे

आदेश ऑक्टोबरपर्यंत दिले जाण्याचीशक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या या निवडणुका ३० नोव्हेंबरपर्यंत होतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

 

पुणे महापालिकेची होणार अडचण ?

राज्य सरकारने महापालिकांतील नगरसेवकांच्या संख्येत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे पुणे महापालिकेची प्रभागरचना नव्याने करावी लागणार आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात

आले आहे. या निकालावर निवडणुकांची दिशा स्पष्ट होणार आहे. दरम्यान,

राज्य सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणुका झाल्यास

त्यामुळे पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि

कोल्हापूर या महापालिकांची अडचण होणार आहे. पुणे महापालिकेची गेली निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली आहे. मात्र, निवडणुकीनंतर ३४

गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची चार

सदस्यीय प्रभागानुसार नव्याने रचना करावी लागेल, अशी दाट शक्यता आहे. नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकांच्या निवडणुका यापूर्वी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्या आहेत, तेथेही प्रभागरचना नव्याने करावी लागू शकते. ही प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुका एक, तीन किंवा चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार की नव्याने प्रभागरचना करावी लागणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.