पवार साहेबच म्हणले पत्रकार परिषदेला थांबू नको – अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण
बारामती, ७ मे २०२३ : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेताना त्यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार हे अनुपस्थित राहिले होते त्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असताना अजित पवार यांनाच थेट त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी “ऐ तुम्हाला सांगितलं ना एकदा पवार साहेबांनी. मी पण त्यांच्या निर्णयाचे स्वागत केलेला आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये चार-पाच खुर्च्या होत्या. त्याच्यामुळे पवार साहेबांनीच तुम्ही थांबू नका असे सांगितले, त्यामुळे मी त्या पत्रकार परिषदेमध्ये नव्हतो” असे स्पष्टपणे पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यापासून दोन दिवस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पण, पक्षनेते, कार्यकर्त्यांच्या रेट्यानंतर निवृत्तीची निर्णय मागे घेत असल्याची घोषणा शुक्रवारी (५ मे) शरद पवारांनी केली. मात्र, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. यावर बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. मी स्वत: ट्वीट करत प्रेसनोट काढली आहे. कालच शरद पवारांनी सांगितले, ‘माझा आणि पत्रकारांचा जास्त संबंध येत नाही’ कारण, मी कामाचा माणूस आहे. कायमच तुमच्याबद्दल संभ्रमाचे वातावरण का निर्माण केले जाते? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी मिश्कीलपणे उत्तर देत म्हटले, “ते तुम्ही प्रश्न विचारता, म्हणून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते. आमच्यावर अतिशय प्रेम करणारे जे लोक आहेत, ते माझ्याबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार करतात.”
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित का होता? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार पत्रकारावर चिडले. “ए… त्याबद्दल शरद पवारांनी सांगितलं आहे ना… पुन्हा, पुन्हा काय रे तेच ते… प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पी. सी. चाको आणि केरळचे आमदार तिथे उपस्थित होते. तसेच, पत्रकार परिषदेत चार-पाच खुर्च्या असतात. त्यामुळे शरद पवारांनी येऊ नका सांगितलं होतं,” अशी स्पष्टोक्ती अजित पवारांनी दिली आहे.
मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “आपले काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे. त्यांनी केंद्रातील किंवा मणिपूरमधील लोकांना बोलावं आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणावं.”