खासदार संजय राऊतांची बडबड म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी – अजित पवारांची टीका
पुणे, १९ जानेवारी २०२४: अजित पवार गट शिंदे गट आणि भाजपवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पातळी सोडून वारंवार टीका करत असतात. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यानंतरही त्यांनी त्यांची ही वक्तव्य सुरूच ठेवली. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राऊत यांचा समाचार घेत राऊत यांची ही बडबड म्हणजे विनाशकालीन विपरीत बुद्धी आहे अशी परखड टीका केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शतक महोत्सवी वर्ष पदार्पण समारंभासाठी पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित केलेल्या केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला उद्देशून खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजित की फजित गट, हे माहीत नसल्याचे वक्तव्य केले होते.
पवार म्हणाले, ‘‘मी राजकारणात आल्यापासून विविध पदावर तरुणांना सातत्याने संधी देत आहे. सध्याच्या विधानसभेत तरुण आमदारांची संख्या मोठी आहे. यापुढेही मी राजकारणात तरुणांना संधी देणार आहे. माझ्या राजकारणाची सुरवात ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदापासून झालेली आहे. त्यानंतर खासदार, आमदार, मंत्री,उपमुख्यमंत्री अशी विविध पदे मिळाली. जिल्हा बॅंकेचे सात वर्षे अध्यक्ष होते. पण या कार्यकाळात जिल्हा बॅंकेचा कधीही एक रुपयाही स्वतःच्या खर्चासाठी वापरला नाही. तरीसुद्धा राज्य बॅंकेत २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माझ्यावर झाला. कोणी काय बोलावे, हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. पण राज्य बॅंकेला यंदा ६०० कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कोणी २५ हजार कोटींचा घोटाळा केला असता, तर हा नफा कसा झाला असता. पण सहकार क्षेत्रात भ्रष्टाचाराचा डाग लागल्याची खंत मनात कायम आहे.’’
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप