प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या सासूचा भाजपात प्रवेश
अहमदनगर, ९ जानेवारी २०२३ : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शशीकला पवार अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित त्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपा प्रवेशानंतर बोलताना शशिकला पवार म्हणाल्या, “कारण मी ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. जनतेने भरपूर मतं देत माझ्यावर विश्वास टाकला आणि मी निवडून आले. या निवडणुकीत मी जनतेला काही कामं करण्याची आश्वासनं दिली होती. हे कामं करण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला.”
“राजकारण हे माझं श्रेत्र नाही, मी गावाच्या विकासासाठी राजकारणात आले. आम्ही वारकरी आहोत. मी निवडणुकीत उभं राहण्याला इंदुरीकर महाराजांचाही विरोध होता. आपलं क्षेत्र वेगळं आहे. कितीही चांगलं काम केलं तरी यात शिंतोडे उडवले जातात, त्रास दिला जाईल, असं महाराज म्हणत होते. मात्र, सर्वसामान्य जनतेसाठी मी स्वतः हा निर्णय घेतला,” असं मत शशिकला पवार यांनी व्यक्त केलं.
“निवडून आल्यावर इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘आता सेवा करायची संधी मिळाली आहे, तर प्रामाणिकपणे सेवा करा आणि संधीचं सोनं करा. यात मान-अपमान समान धरायचं. कोणी बोललं तरी ते सहन करा. सामान्य जनतेने तुमचा हात धरला, त्या हाताला धोका देऊ नका’”, अशी माहिती शशिकला पवार यांनी दिली.