मोदी २०२४ मध्ये पंतप्रधान राहणार नाहीत – प्रकाश आंबेडकर यांचा दावा
पुणे, १३ ऑगस्ट २०२३: देशातील राजकीय परिस्थिती पाहता २०२३ मध्ये कुणाचं सरकार येईल हे मी आताच सांगत नाही. मात्र सरकार कुणाचंही असो नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आरएसएसला तत्वाचं राजकारण, नितीमत्तेचं राजकारण याची काहीच गरज वाटत नाही. राजकारणात सध्या युती आणि आघाड्या होत आहेत त्यांनी कायमची मूठमाती द्या असे आम्ही २०२४ च्या निवडणुकीत लोकांना सांगणार आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत मोठा खुलासा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. मात्र, आंबेडकर यांनी या भेटीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.
आंबेडकर म्हणाले, “अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर थोड्याच दिवसात माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळाला. यात काही कनेक्शन आहे असे वाटते का, या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले, तसं काही वाटत नाही. आम्हाला जी माहिती मिळत होती त्यावरून त्यांच्या प्रकृतीचा विषय होता. कोर्टाने सुद्धा त्यांच्या वैद्यकिय कारणांमुळेच त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.”
या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुमचा शरद पवार की अजित पवार यांपैकी कुणावर विश्वास आहे असा प्रश्न विचारला त्यावर आंबेडकर यांनी उत्तर देताच जोरदार हशा पिकला. आंबेडकर यांनी माझा कुणावरच विश्वास नाही असे म्हणत हा मुद्दाच निकाली काढला.