मनसेची ४५ जणांची उमेदवारी यादी जाहीर, अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
पुणे, २२ आॅक्टोबर २०२४: उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता दुसरे ठाकरे म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभा लढवणार आहेत. त्यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर पुण्यातून कोथरूड मधून किशोर शिंदे, हडपसर मधून साईनाथ बाबर आणि खडकवासला मतदारसंघातून मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
मनसेतर्फे राज्यातील किमान २२५ मतदार संघातून उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा यापूर्वी राज ठाकरे यांनी केलेली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर मनसेच्या यादीकडे लक्ष लागले होते भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांतर्फे देखील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आज रात्री मनसेने ४४ उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणुकीतच्या रिंगणात. कोथरूड मधून किशोर शिंदे यांना चौथ्यांदा संधी देण्यात आलेली आहे सलग तीन वेळा शिंदे यांचा कोथरूड मधून पराभव झाल्याने त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी मनसेतील पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्या ऐवजी नवीन चेहऱ्यांचा विचार केला जावा असा त्यांचा आग्रह होता. मात्र राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर हे निवडणूक लढवणार आहेत. तर खडकवासला मतदारसंघातून मयुरेश वांजळे हे निवडणूक लढवणार आहेत.
मयुरेश वांजळे हे स्वर्गीय रमेश वांजळे यांचे पुत्र असून, रमेश वांजळे हे २००९ मध्ये मनसेतर्फे निवडणूक लढवून आमदार झालेले होते. पुणे जिल्ह्यातील पहिले मनसेचे आमदार म्हणून रमेश वांजळे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र देखील आता नशीब आज होणार आहेत.