जयंत पाटील यांच्याच गटातील आमदार आमच्या संपर्कात: सुनील तटकरेंचा दावा

मुंबई, १९ ऑक्टोबर २०२३: अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत ४१ आमदार गेले आहेत, पण त्यातील काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात येणार असल्याचा दावा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. त्याला आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर देत, शरद पवार गटातील आमदराच आमच्या संपर्कात आहेत असे सांगितले.

आज सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, ज्यांनी अजित पवार गटाचे 15 आमदार संपर्कात आहेत, असं वक्तव्य केलं तेच आमच्या संपर्कात आहेत. यावर मी जास्त बोलायची गरज नहाी. एखादा दुसरा आमदार सोडला तर सर्व आमदार अजितदादांसोबत असल्याचे पाहायला मिळतंय. विधीमंडळाच्या बैठकीलाही अनेक आमदार हजर राहत असतात, असं म्हटलं. जयंत पाटील यांच्या पोटातलं पाणी हलत नाही, डोळ्यातलं पाणी बदलत ना, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही त्यामुळं मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजातून विरोध केला जात आहे. याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, दोन समाजाच्या मागण्या भिन्न आहेत. जरांगे यांनी काय म्हणावं त्यांचा प्रश्न आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीला धक्का न लागता सरकारने काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारने कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घ्यावा, असं तटकरे म्हणाले.

ते म्हणाले, सुनील कावळे या तरुणांने आज आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचं पाऊल उचललं. मुंबईत गळफास घेत या तरुणाने आयुष्य संपवलं. ही ही दुःखद घटना आहे. समाजाला आरक्षण मिळावं ही तीव्र भावना प्रत्येक समाजात असते. पण, असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, बुधवारी माध्यमांशी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. अनेकांना पक्षात परत यायचे आहे. त्याबाबत विचार सुरू आहे. पण मी आत्ताच त्याच्या खोलात जाणार नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, असं मला वाटतं. त्यांची काही कामं आहेत. ती झाली पाहिजेत. या आमदारांना पक्षात घ्यायचं की, नाही याचा निर्णय शरद पवार घेतील. अंतिम निर्णय त्यांचाच असेल. मात्र, अजित पवार गटातील अऩेक आमदारांना परत येण्याची इच्छा आहे, असं पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जयंत पाटील हेच आठ आमदारांसह आमच्या संपर्कात असल्याचं विधान केलं. तर आता सुनील तटकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळं आता जयंत पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.