आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
पुणे, २२ डिसेंबर २०२२: कसबा पेठ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता शैलेश टिळक (वय ५७) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. भाजपच्या या पुण्यातील पहिल्या महापौर म्हणून २०१७ मध्ये निवडून आल्या होत्या.
लोकमान्य टिळक यांच्या घराण्याच्या त्या स्नुषा होत. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत. त्यांचा जन्म ग्वाल्हेर येथे झाला होता. मुक्ता टिळक या पुण्याच्या मुलींच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे काॅलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. मानसशास्त्र विषयातून एमए झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले आहे. त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीए आहेत आणि या शिवाय त्यांनी पत्रकारितेचा एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यांनी काही वर्षे एका कंपनीच्या मार्केटिंग विभागात नोकरी केली.
महिलांसाठी वॉर्ड आरक्षित झाल्यानंतर १९९७ मध्ये त्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या. त्यांनतर त्या सलग २५ वर्षे नगरसेविका होत्या. त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही भूषविले. भाजप २०१७ मध्ये पुणे महापालिकेत पहिल्यांदा बहुमत मिळवून सत्तेवर आले त्यावेळी भाजपने पहिल्या महापौर म्हणून मुक्त टिळक यांची निवड केली. महापौर पद संपतानाच २०१९ मध्ये त्यांना भाजपने कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. तेथून मोठ्या बहुमताने विजयी झाल्या.