आमदार जयकुमार गोरेंची गाडी पुलावरून कोसळली
सातारा, २४ डिसेंबर २०२२: सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहेत.
या अपघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह दोन जण जखमी झाले आहेत. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात जयकुमार गोरे जखमी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशाला गोरे हे उपस्थित होते. नागपूरहून ते आपल्या गावी येत असताना हा अपघात झाला. सध्या रुबी हॉल येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल , खासदार रणजित निंबाळकर उपस्थित आहेत.
पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यातील फलटणच्या मलठण येथे हा अपघात झाला. माणचे भाजप आमदार असलेले जयकुमार गोरे हे नागपुरहून विमानाने पुण्यात आले होते. त्यानंतर ते त्यांच्या फॉर्च्युनर कारने पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.
गाडीमध्ये ह चार जण प्रवास करत होते. अपघातात गोरे जखमी झाले असून गाडीमधील 2 जण गंभीर जखमी झाले असून इतर 2 दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मान खटाव मतदार संघातील गोरे यांचे समर्थक रुबी हॉल येथे पोहचले आहे. गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाँक्टरांनी सांगितले.