मंत्री मोहोळ आणि खासदार सुळेंंमध्ये जुंपली, ठेकेदारांवरून सुळेंच्या टिकेला मोहोळांचे प्रत्युत्तर

पुणे, १० जून २०२४: खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेकेदारांवरून लगावलेल्या टोल्याला केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे या दोघा नेत्यांमध्ये जुंपली असून आगामी काळात अशाच पध्दतीने राजकिय संघर्ष रंगण्याची शक्तता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन समारंभासाठी पुण्यात पक्ष कार्यालयात माध्यमांशी बोलताना खासदार सुळे यांंनी मोहोळ यांना लक्ष केले होते. त्या म्हणाल्या, पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रिपद मिळाले त्यात मला आनंद आहे. पण त्याचा फायदा कॅान्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा असा टोला लगावला होता.

त्यावर राज्यमंत्री मोहोळ यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रतिउत्तर देताना सुळे यांना शुभेच्छाबद्दल धन्यवाद व्यक्त करताना म्हटले आहे की, जवळपास 40 वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे. पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं. आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो या शब्दात सुळेंना सुनावले आहे. तसेच ठेकेदार कोणी पोसले, कोणी मोठे केले, पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत. हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही असा टोलाही मोहोळ यांनी लगावला आहे.