लाखो मराठे मुंबईवर धडकणार ; जरांगे पाटील यांनी जाहीर केला पायी चालत जाण्याचा मार्ग
छत्रपती संभाजीनगर, २८ डिसेंबर २०२३ : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईतील आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबईतील आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना कोणत्या मार्गाने मुंबई गाठणार याचा खुलासा जरांगे पाटील यांनी आज केला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव २० जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाचा मुंबईकडे जाण्याचा मार्ग कसा असेल याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील आंदोलनाची रुपरेषा सांगितली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, येत्या २० जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात आंतरवाली सराटी येथून होणार आहे. लाखो समाजबांधव पायी प्रवास करून मुंबईत येणार आहेत. या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आपल्या मुलांना आरक्षण मिळवून देण्याची ही शेवटची संधी आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर गावकऱ्यांनी समाजबांधवांना सहकार्य करावं. त्यांच्या भोजनाची आणि पाण्याची व्यवस्था करावी, असेही आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
आपण ठरल्याप्रमाणे २० जानेवारी रोजी मुंबईला निघणार आहोत आणि आरक्षण घेऊनच माघारी फिरणार आहोत. तेव्हा आंदोलनात कुणीही बाहेरचं शिरलं तर त्याला तत्काळ पोलिसांच्या हवाली करा. आपले सण उत्सव नंतर साजरे करा. सध्या मराठा आरक्षण हे एकच ध्येय असलं पाहिजे. एकदा घराबाहेर पडलं की आरक्षण घेऊनच माघारी येऊ. आंदोलनात कुणीही उद्रेक करू नका. आंदोलन शांततेत होईल याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
असा राहिल मुंबईचा मार्ग
आंतरवाली सराटी, जालना, शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, नगर, सुपा, शिरुर, वाघोली, पुणे,पुणे-मुंबई हायवे, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदान अशा मार्गाने मुंबईत पोहोचणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.