नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर बैठका- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, 14 सप्टेंबर 2023: पुणे शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित कराव्यात तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील समस्या व विकासकामांचा आढावा पालकमंत्री पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व प्रभाग कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, नागरिकांच्या पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा वाहतूक, रस्ते, सांडपाणी (ड्रेनेज) वाहिन्या सुस्थितीत असणे या मूलभूत अपेक्षा असतात. त्याची वेळीच दखल घेत महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी. पाणीपुरवठ्यातील समस्या कायमस्वरुपी सोडविण्याच्यादृष्टीने समान पाणीपुरवठा योजनेची कामे तसेच पाण्याच्या टाक्यांची कामे गतीने पूर्ण करावीत. रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामांचे योग्य संनियंत्रण करावे, असेही ते म्हणाले.
मतदार संघातील समस्यांच्या अनुषंगाने आमदार शिरोळे यांनी माहिती देऊन त्या त्वरित दूर करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.