मेधा कुलकर्णी यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर जाहीर टीका
पुणे, १०/०८/२०२३: चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होत असताना त्याच्या आदल्याचे दिवशी भाजपमधील गटबाजी उफाळून आलेली आहे. या कार्यक्रमांमध्ये भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना कोणते स्थान देण्यात आले नाही, तसेच पक्षाच्या बैठकीलाही बोलविण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाकडून दिली जाणार्या वागणुकीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर निषेध करत निष्ठावंतांना त्याच पद्धतीने वागणूक दिली जात आहे अशी टीका केली. तसेच कोथरूडचे सध्याचे आधुनिक नेते यांनी चांदणी चौकाच्या विषयात काही केलेले नाही अशी नाव न घेता अप्रत्यक्षपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
गेल्या पाच वर्षापासून चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू होते. हा उड्डाणपुल व्हावा यासाठी मेधा कुलकर्णी यांनी पूर्वीपासून प्रयत्न केलेले आहेत. 2019 ला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून कुलकर्णी यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना वारंवार पक्षाच्या नेत्यांकडून डावले जात आहे. कुलकर्णी या सध्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असताना देखील मतदारसंघात त्यांना कोणी महत्त्व देत नाही अशी स्थिती आहे. त्यावर अखेर त्यांनी पोस्ट टाकत खदखद व्यक्ती केली.
” असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे “
माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.
चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.
चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नि तीन गडकरी जी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?
मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.
साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.
गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.
देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.
"Disappointed"
.
.#BJPKothrud #BjpPune pic.twitter.com/UEIV1lV40w— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) August 11, 2023
माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे.
त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.
अशी फेसबुक पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी शेअर केली आहे.