मराठा आरक्षण पेटले: राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, एसटी सेवेवर परिणाम
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३: आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले असून, त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटण्यास सुरवात झाली आहे. आमदारांचा बंगला जाळण्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय, माजलगाव नगरपरिषदेचे कार्यालायाला आंदोलकांनी आग लावून टाकली. त्यामुळे आरक्षणाचा विषय महाराष्ट्र पेटविणारा ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यांची तब्येत खराब झाल्याने लाखो मराठा आंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. त्यातूनच सरकारबद्दल नाराजी वाढत असून, संतप्त मराठा आंदोलक रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलनाकडे वळाले आहेत. त्यामुळे याची धग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) आमदार प्रकाश सोळंखे यांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने च्या घरावर आंदोलकांनी दगडफेक सुरु केली, त्यानंतर काही वेळातच पार्किंगमधील गाड्यांना आग लावून दिल्याने संपूर्ण बंगला आगीत सापडला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.
संतप्त आंदोलकांनी माजलगाव नगरपालिकेच्या इमारतीलाही आग लावली, शेकडो दस्तावेज जळून खाक झाल्याची भीती आहे. हे मोठे नुकसान झाले आहे.
बीडचे पोलिस अधिक्षक पंकज कुमावत माजलगावला भेट द्यायला गेले, त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी आहे.
मराठवाड्यात सातत्यानं होणाऱ्या आंदोलनाच्या घटनांमुळे नांदेड जिल्ह्यातील बस सेवा दोन दिवसापासून बंद, प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. हिंगोलीत रस्त्यावर टायर जाळून चक्काजाम, वसमत आणि इतर भागात मराठा आंदोलकांचा संताप व्यक्त केला.
सोलापूर डेपोने मराठवाडा विभागातील जाणाऱ्या सगळ्या बस रद्द केल्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.
परभणीत मानोलीत तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. तर धुळ्यात रामदास कदम, नारायण राणे यांच्या फोटोंना जोडेमारा आंदोलन करून नेत्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
बारामतीमध्ये अजित पवार यांचाच आदेश चालत असला तरी मराठा आंदोलकांनी त्यांना देखील सोडले नाही. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन भरकटले असल्याची टीका केली आहे. तर जरांगे पाटील यांनी नेत्यांनी तोंडाला आवर घालावी असा इशारा दिला आहे.
सोलापुरात कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हेत्रेंना घेराव.. आंदोलकांची घोषणाबाजी
छत्रपती संभाजीनगरातून विविध जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस रद्द.. प्रवाशांचं मोठं नुकसान