..तर विधानसभेला २८८ जागा लढविणार – मनोज जरांगे पाटील

पुणे, ३१ मे २०२४ ः “महाराष्ट्रातील मराठा समाज एकतर्फी आहे, पण कोण निवडून येईल, हे मी सांगू शकत नाही. मी कोणाचेही नाव घेऊन, त्यांना पाडा असे सांगितले नाही. जनतेला मताचा अधिकार आहे, त्यांना फक्त पाडा म्हणजे आपली ताकद दिसेल हे सांगितले होते. पण कोणाला मस्ती असेल, तर विधानसभेला बघू. मराठा आरक्षणासंबंधी मागण्या पूर्ण न केल्यास विधानसभेला २८८जागांवर निवडणूक लढविणार’ असा थेट इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी दिला.

जरांगे पाटील शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना जरांगे पाटील म्हणाले, ” मराठा आरक्षण आंदोलन ४ जूनपासून सुरू होईल. मराठा व कुणबी एकच आहेत, हा कायदा पारीत होण्यासाठी करावा, सगे-सोयरेची अंमलबजावणी केली नाही. तर विधानसभेला सर्व २८८ जागांवर निवडणूक लढणार आहे’

बीडमधील वाढत्या जातीयवादाबद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, “मराठा व ओबीसी या दोन्ही समाजाने शांत रहावे, असे माझे त्यांना आवाहन आहे. त्यांनीही आवाहन केले पाहीजे. आपल्याला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची आहे. मराठा समाज यापूर्वीही आणि आताही शांत आहे. जातीजातीमध्ये द्वेष पसरविण्याचे काम नेत्यांकडून केले जात आहे. त्या नेत्यांच्या विरोधात आम्ही बोलत आहोत. जातीविषयक मी कधीही बोलत नाही, सर्वसामान्य ओबीसी बांधवांना कधीही दुखावलेले नाही, यापुढेही दुखावणार नाही. नेते आम्हाला विरोध करतात, म्हणून आम्ही त्या नेत्यांना विरोध करतो. नेत्यांना पाडा असे कोणीही म्हणू शकतो, त्यामध्ये जातीयवाद आला कुठे ? नेतेही विरोधी उमेदवाराला पाडा असे म्हणतात, मग तिथे जातीयवाद असतो का ?’

राज्य सरकारने विविध योजनांसाठी २६ कोटी रुपये मंजूर केले आहेत, त्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर जरांगे पाटील म्हणाले, ‘‘सरकारने विविध योजनांसाठी दिलेल्या निधीचा काहीही फायदा होणार नाही. मराठा, मुस्लिम, दलितांसह बारा बलुतेदारांमध्ये नाराजीची लाट पसरलेली आहे. ती लाट थंड करण्यासाठी आणि त्यांची सकारात्मक बाजू दाखविण्यासाठी निधी, जाहिराती देण्याचा त्यांचा खटाटोप सुरू आहे. पण हे सर्व करण्यापेक्षा मराठा व कुणबी हे एकच आहेत हे सिद्ध झाले आहे, मग मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यायला पाहिजे.हीच आमची मागणी आहे.’’