फेब्रुवारीत महाविकास आघाडीचे तुकडे पडतील : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, २२ डिसेंबर २०२३ : ‘‘एक दिल के तुकडे हुए हजार, कोई कहाँ गिरा और कोई कहाँ गिरा’ अशी महाविकास आघाडीची स्थिती फेब्रुवारीमध्ये होणार आहे. काँग्रेस असेल, वा उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडील जेवढे लोक भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्यांच्याकरिता कमळाचा दुपट्टा तयार आहे,’’ असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या पुढील वाटचालीवर टिप्पणी केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला बावनकुळे यांनी शुक्रवारी भेट दिली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला खडेबोल सुनावले. अयोद्धेतील राम मंदिराच्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांच्याकडून होत आहे. याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले,‘‘काही लोकांना सकाळी उठून एखादा मुद्दा घेऊन बोलावे लागत आणि दिवसभर प्रसारमाध्यमांची ‘स्पेस’ घ्यावी लागते. पण अयोध्येतील राम मंदिर उद्‌घाटन सोहळ्याबाबत होणारे नियोजन सर्व बाजूंचा विचार करूनच होत आहे. आम्हाला देखील अजून निमंत्रण आले नाही.’’

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य प्रकारे दखल घेतली आहे. त्यावर सरकार काम करत आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि फायदेशीर ठरणारे आरक्षण दिले जाणार आहे. तसेच पुन्हा कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागू नये, याची काळजी सरकार घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे नक्कीच आरक्षण मिळेल.’’

राज्य सरकारने वर्षाच्या अखेरीस राज्यात दारू विक्रीला परवानगी दिली आहे, याबाबत विचारले असताना बावनकुळे म्हणाले,‘‘मी या विभागाचा तीन वर्ष मंत्री होतो. त्यामुळे मला अनेक गोष्टी माहिती आहेत. राज्यातील  दारू बंदी केली जाते. त्या ठिकाणी काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होते. त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी, सरकार कधी-कधी अशी पावले उचलते. ‘ज्याला दारू घ्यायची आहे, तो घेणारच आहे. ज्याला प्यायची तो पिणारच आहे.’ पण पिताना आणि घेताना या दोघांना अडचणी निर्माण होतात. त्यात विषारी दारू, काळा बाजार अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा निर्णय घेतला जातो.’’

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप