महाविकास आघाडीचा लोकसभेसाठी १६-१६-१६ चे सूत्र ?

अकोला, १६ मे २०२३ ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवता आल्याने महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे. त्यापार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली, त्यामध्ये राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात अशी चर्चा झाल्याची चर्चा आहे. मात्र, यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नेत्यांनी दिलेली नाही.

देशाची आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली आहे. देशभरातले जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू झल्या आहेत. सत्ताधारी भाजपाविरोधात विरोधी पक्ष एकजूट तयार करत आहेत. राज्यातही शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करून भाजपासमोर आव्हान निर्माण केलं आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेससह मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे.

महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. आगामी रणनीती, महाविकास आघाडीच्या सभा आणि जागावाटपाबाबत यामध्ये चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाकडून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून नाना पटोले, भाई जगताप यांच्यासह अनेक मोठे उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात असा निर्णय झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. ठाकरे गट १६, राष्ट्रवादी १६ आणि काँग्रेस १६ जागा लढवेल असं बोललं जात आहे. परंतु याबद्दल तिन्ही पक्षांच्या कोणताही नेत्याने याबाबत पुष्टी केली नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला दंगलीबाबत आज (१६ मे) सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पटोले यांना महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या फॉर्म्युलाबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. लोकसभेला महाविकास आघाडीचा १६-१६-१६ चा फॉर्म्युला ठरलाय का? असा प्रश्न पटोले यांना विचारल्यावर पटोले म्हणाले, याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चा झाली आहे. जागावाटपाचा मुद्दा अजून पुढे गेलेला नाही.

दरम्यान, या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा काय फॉर्म्युला ठरवला आहे असा प्रश्न विचारला. त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला काहीच माहिती नाही. त्या बैठकीत मी आंधळा, मुका आणि बहिरा होतो.