महाराष्ट्र: स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ
पुणे, १३/०८/२०२३: स्वातंत्र्यदिनी कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या राज्यातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली असून, मंगळवारी (१५ ऑगस्ट) विशेष माफी देण्यात आलेल्या कैद्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने कारागृहात चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना (बंदी) विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली असून स्वातंत्र्यदिनी त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. कारागृहातील विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तीन टप्यांमध्ये विशेष माफी देण्यात आली आहे. कैद्यांमधील शिस्त, त्यांचे आचारण विचारात घेऊन त्यांना भावी आयुष्यात प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षा माफ करण्यात आली आहे, असे कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माफी योजनेेचे निकष निश्चित केले होते. राज्यातील कैद्यांची शिक्षा माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. दुसऱ्या टप्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. तिसऱ्या टप्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. राज्यातील येरवडा, मुंबई, नाशिक रोड, ठाणे, नागपूर, अमरावतीसह २४ कारागृहातील कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे.
ज्या कैद्यांचे वय ६० वर्ष झाले आहे, तसेच ज्या कैद्यांनी एकूण शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण केला आहे. त्यांना शिक्षेतून माफी देण्यात आली आहे. शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले राज्यात ७ कैदी आहेत. काही कैद्यांनी तारुण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही. अशा राज्यातील दहा कैद्यांची मुक्तता कारागृहात कारागृहातून करण्यात येणार आहे. तरुण कैद्यांनी शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. काही बंद्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा कैद्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यास त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. शिक्षेत सुनावण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असणाऱ्या कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. एकुण शिक्षेचा ६६ टक्के कालावधी पूर्ण करणाऱ्या १६७ कैद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे.