‘लोकसभेत ४५ जागा कशा जिंकता येतील याकडं लक्ष द्या’; तटकरेंचा केसरकरांना खोचक टोला
भंडारा, ७ नोव्हेंबर २०२३ : अजित पवारांचा गट सरकारमध्ये सहभागी होऊन चार महिने उलटून गेले आहेत. या गटातील आमदारांना मंत्रीपदेही मिळाली आहेत. मात्र शिंदे गट आणि अजित पवार गटातील धुसफूस अजूनही कायम आहे. अजित पवारांचा गट आल्यापासूनच शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. आताही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून खासदार सुनील तटकरे यांनी केसरकरांना चांगलेच सुनावले आहे. अजित पवारांच्या वयावर बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीत 45 पेक्षा जागा कशा जिंकता येतील याकडे लक्ष द्यावे असा खोचक सल्लाही त्यांनी केसरकरांना दिला.
भंडारा येथे तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना केसरकरांच्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर तटकरे यांनी केसरकरांना खोचक शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, वयावर नाही तर कर्तुत्वावर पदं मिळतात. तुमची प्रतिमा, जनतेचं पाठबळही महत्वाचं आहे. लोकसभेची निवडणूक जिंकणे हे राजकीय आव्हान आहे. त्यामुळे अजित पवारांच्या वयावर बोलण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा कशा जिंकता येतील याकडे लक्ष द्यावे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. पण, जागा वाटपासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. लोकसभेला ४५ हून आधिक जागा जिंकण्याचा निश्चय महायुतीती तिन्ही पक्षांनी केला आहे. लवकरच जागावाटपाबाबत चर्चा करू, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काटेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना केसरकर म्हणाले होते, की मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असण्यात काही चुकीचं नाही. पण, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढल्या जातील. अजित पवारांचं वय लहान आहे. त्यांना पुढील काळात मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप