अजित पवार यांच्यासाठी अडकली विधान परिषदेची यादी
मुंबई, ४ सप्टेंबर २०२४: विधान परिषदेवर राज्यपालांनी नेमावयाच्या सदस्यांची यादी तयार करण्याची घाई महायुतीत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस. पक्षाने तीन नावे निश्चित न केल्याने ही यादी अडकल्याचे समजते. विधान परिषदेच्या रिक्त १२ जागांपैकी सहा जागा भाजप घेणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा देण्यात येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातील याचिका प्रलंबित आहे. ‘गेली काही वर्षे सदस्य का निवडले नाहीत? आता तरी सदस्य नेमणार का?,’ अशी विचारणा न्यायालयाने केली असता सरकारी वकिलांनी येत्या काही दिवसात प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही नावे जाहीर होणे अशक्य असल्याने येत्या आठवड्यातच राज्यपालांकडे नावे पाठवावीत, असे सत्ताधारी पक्षाने ठरविले आहे. ही नावे अंतिम करण्याची प्रक्रिया त्या त्या पक्षात सुरू आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याच पक्षाला इच्छुकांना नाराज करणे शक्य नसल्याने नावे अंतिम करणे कठीण आहे. निवडणुकीचा निकाल वेगळा लागला तर बाराही आमदारांची नेमणूक हाती राहणार नाही. हे वास्तव लक्षात घेत सत्ताधारी महायुतीने आता नावे अंतिम करण्याचे ठरवले आहे.
राज्यपाल या प्रकरणात पक्षकार ठरविण्यात आल्याने या संदर्भातील प्रत्येक पाऊल अत्यंत लक्षपूर्वक टाकले जाईल. ही प्रक्रिया जटिल आहे. तरीही सत्ताधारी महायुती १२ सदस्य नेमणुकीची जोरदार तयारी करते आहे. अजित पवार यांच्या पक्षाने तीन नावे निश्चित करण्यात बरीच असमर्थता दाखवली असल्याचे समजते.
कोंडीतून मार्ग कसा काढायचा?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नावे आल्यानंतर लगेचच ही यादी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल, असेही बोलले जाते आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत चर्चाही आज झाली. अजित पवार यांना ६० जागा लढायच्या आहेत. तसा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात त्यांनी कोणत्याही जागांचा आग्रह धरलेला नाही. २०१९ मध्ये ५४ जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्या होत्या. शिवाय अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेल्या काही अपक्षांनाही संधी द्यायला हवी म्हणून ६० हा आकडा चर्चेत आलेला आहे. या जागा आम्ही मागितलेल्या नाहीत. त्यामुळे महायुतीने त्या मान्य करण्याचा प्रश्नच नाही, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता असून, या कोंडीतून मार्ग कसा काढायचा, याबद्दल अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चर्चा करत असल्याचे समजते.