
शिंदे-फडणवीस नेभळटपणा सोडा: अजित पवार यांची टीका
मुंबई, ६ डिसेंबर २०२२ः मराठी भाषक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी तीव्र निषेध केला. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारने नेभळटपणा सोडावा अशी टीका केली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागाचा वाद काही दिवसांपासून पेटला असताना आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे बेळगावला जाणार होते. येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यर्त्यांशी चर्चा करणार होते. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी टीका करून वाद वाढवला.
“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटसारखे कन्नडभाषिक भाग आमच्या समाविष्ट केले पाहिजेत”, अशी टीका केली. त्यानंतर पाटील यांचा दौरा रद्द झाला आहे.
दरम्यान , यावर अजित पवार यांनी टीका केली.
या वादात महाराष्ट्रातील भाजप सरकारकडून बोटचेपी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्यानंतर आता चंद्रकांत पाटील बेळगाव येथे निघाले आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई ३ डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारनं खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारनं दाखवावी. कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारनं यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीनं सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनी देखील आपलं कर्तव्य पार पाडावं. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे, असे पवार यांनी नमूद केले.