कोल्हापूर: शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे -जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. ०७/०६/२०२३: कोल्हापूर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी निश्चिंत रहावे. नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील आणि जिल्ह्यातील शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेची पाहणी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. या पाहणी नंतर कोल्हापूरांना आवाहन करताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेवून आजवर कोल्हापूर जिल्ह्याने जगाला पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे. जगाला आदर्श विचार देणारा हा संपूर्ण जिल्हा आहे. कोल्हापूरचा सामाजिक क्षेत्रातील ठसा कायम राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन करुन प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी श्री. रेखावार यांनी आदेशित केले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप