खडसेंनी घेतली अमित शाहांची भेट; फडणवीसांना धक्का देत कमबॅकची तयारी?
नवी दिल्ली, २१ जून २०२४ : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने सपाटून मार खाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॅकफुटवर गेले आहेत, मोदी शहा हे त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांचे पंख छाटणार अशी चर्चा असताना आता फडणवीसांचे विरोधक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी खासदार रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ खडसे केव्हा भाजपवापसी करतात, पक्षाकडून त्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. २३ जागा जिंकणारा भाजप फक्त ९ जागांवरच थांबला. केंद्रीय मंत्र्यांनाही पराभवाचा फटका बसला. राज्यात काँग्रेसने १४ जागा जिंकत नंबर एकचा पक्ष होण्याचा मान मिळवला. या निवडणुकीत भाजपने २८ उमेदवार दिले होते. फक्त ९ उमेदवार विजयी झाले. भारतीय जनता पार्टीच्या या खराब कामगिरीवर पक्षनेतृत्वाने नाराजी व्यक्त केली.
राज्यातील नेत्यांना कठोर शब्दांत फटकारले. भाजपाचं चुकलं कुठं याची माहिती श्रेष्ठींनी घेतली. तसेच महाराष्ट्रात कोणा एकाच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा. जुन्या नेत्यांना सोबत घ्या. इच्छुक उमेदवारांना आतापासूनच तयारी करायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका, असेही दिल्लीतील वरिष्ठांनी या बैठकीत सांगितले होते.
राज्यातील भाजपाच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व प्रचंड नाराज आहे. त्यामुळे भाजपात लवकरच बदल होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करून भाजपला सोडचिठ्ठी देणार एकनाथ खडसे लवकरच पक्षात सक्रिय होऊ शकतात. त्यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेऊन मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. या राजकारणाची तयारी भाजपने आधीपासूनच सुरू केली आहे. रावेरमधून तिसऱ्यांदा खासदारकी मिळवणाऱ्या रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्रिपद दिलं आहे. त्यानंतर आता खडसेंना मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली पक्ष नेतृत्वाने सुरू केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर वरिष्ठ नेते कमालीचे नाराज आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ खडसेंना पक्षात पुन्हा सक्रिय करून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्य मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळू शकतं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचा कारभारही खडसेंच्या हाती दिला जाऊ शकतो. जर त्यांना गृहखातं दिलं गेलं नाही तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली जाईल. सध्या चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ २०२५मध्ये संपणार आहे.