वाद बाजूला ठेवून पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट
मुंबई, १२ जानेवारी २०२३ : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय गैर उघड आहे. पण ज्यावेळी कुटुंब म्हणून एकत्र येण्याची वेळ येते त्यावेळी हे दोन्ही भाऊ-बहीण वाद बाजूला ठेवून सोबत येतात. असाच अनुभव बुधवारी याला पंकजा मुंडे यांनी अपघातग्रस्त असलेल्या धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे नात्याने बहीण-भाऊ असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. हे भाऊ-बहीण राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बीड, तसेच परळी येथील विकासकामांच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. मात्र हेच राजकीय वैर मागे टाकत पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसत आहेत.
धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी ( ३ जानेवारी) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला होता. मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती देण्यात आली होती. मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला होता. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे अपघाताची घटना घडली होती.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.