“कर्नाटकच्या निवडणुकीमुळे लोकसभेचा अंदाज आला” – शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई, १३ मे २०२३: “अलिकडच्या काळात भाजपाकडून इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात आमदार फोडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी सत्तेचा वापर करणं हे सूत्र वापरलं आह. कर्नाटकातही त्यांनी हेच केलं. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदेंनी केलं, तेच तिथे झालं. तेच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या बाबतीत केलं. गोव्यातही भाजपाचं बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करून राबवली जात आहे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही. याचं उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसलं आहे. यानिवडणुकीमुळे लोकसभा निवडणुकीत काय होणार याचा अंदाज आला”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाल्याचं दिसून येत असून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रीय नेत्यांनीही हा पराभव मान्य करून विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून या निकालावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकमध्ये भाजपाच्या झालेल्या मोठ्या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही शरद पवारांनी लक्ष्य केलं आहे.
पवार म्हणाले, ‘‘यश-अपयश समजू शकतो. पण कर्नाटकात भाजपाचा सपशेल पराभव करण्याची भूमिका तिथल्या जनतेनं घेतली होती. मी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन करतो. त्यांनी भाजपाला धडा शिकवला. आता ही प्रक्रिया देशभरात होईल. आता केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं राज्य नाही. त्यामुळे बहुसंख्य राज्यात भाजपा सत्तेच्या बाहेर आहे. २०२४च्या निवडणुकीत काय चित्र दिसणार आहे, याचा एक अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो”, अशी भूमिका यावेळी शरद पवार यांनी मांडली.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकमध्ये दिलेल्या ‘बजरंग बली की जय’ घोषणेचा समाचार घेतला. “धर्म आणि जात याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या वेळी त्याच्यात यश येतं. पण लोकांना हे आवडत नाही. बजरंग बली की जयचा मुद्दा निवडणुकीत काढण्याचं कारण नव्हतं. धर्मनिरपेक्षतेवर निष्ठा असल्याची शपथ आम्ही संसदेत घेतली. पण अशी शपथ घेतलेल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीनं अशी घोषणा करणं शोभत नाही. ते काम त्यांनी केलं. त्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे”, असं शरद पवार म्हणाले.
‘कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली तर दंगल होईल’, असं विधान अमित शाह यांनी केलं होतं. त्यावरूनही शरद पवारांनी टीका केली. “गृहमंत्र्यांनी तारतम्य राखून बोलायचं असतं. दंगल देशात कुठेच होता कामा नये. कुणाचंही सरकार असो. कारण त्याची किंमत देशाला आणि सामान्य माणसाला चुकवावी लागते. अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे ही दमदाटीच आहे. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. लोकांनी त्याची नोंद घेतली आणि त्याचा तीव्र निकाल लोकांनी दिला आहे”, असं शरद पवार म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप