कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने शिंदेच्या शिलेदाराची अडचण वाढल

छत्रपती संभाजीनगर, १९ नोव्हेंबर २०२४ ः स्वयंघोषित महाराज कालीचरण यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धार्मिक सभा आयोजित केली होती. त्यावेळी कालीचरण महाराज यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख केला होता. या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार संजय शिरसाठ अडचणीत आले असून, निवडणुकीत फटका बसू नये यासाठी धडपड सुरु केली आहे.

‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’ अशा शब्दांत कालीचरण महाराज यांनी जरांगे पाटलांवर टीका केलीय. कालीचरण महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात येतोय. मराठावाड्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यानंतर ऐन मतदानाच्या काळातच वातावरण तापलेलं आहे. हा कार्यक्रम संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात झाला होता. यावर शिरसाट यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत.

यावेळी संजय शिरसाट म्हणाले की, माझ्या मतदारसंघामध्ये झालेल्या कालीचरण यांच्या सभेसोबत माझा काहीही संबंध नाही. मी त्यांना भेटलेलो देखील नाही. केवळ माझा बॅनर त्याठिकाणी लागलेला होता. परंतु माझं नाव सभेशी जोडलं गेल्यामुळे मोठा गैरसमज निर्माण होतोय. माझ्यात अन् जरांगे पाटलांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनात मी पहिल्या दिवसापासून सहकार्य करत आलेलो आहे. जर मराठा समाजात गैरसमज निर्माण झाला तर त्याचा परिणाम वाईट होईल, मला याची जाणीव आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनीही कालीचरण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, मी साधू-संताचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व मानतो. माझ्याबद्दल जे (कालीचरण महाराज) बरळत आहेत, त्यांना बरळू द्यावं. कारण एका पक्षाचा ठेका घेतलेल्या लोकांबद्दल आपण काही बोललं नाही पाहिजं. संत आणि महात्म्यांचा आदर करणं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं असल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

“आम्ही आरक्षण मागतो, म्हणजे आम्ही जातीवाद करत नाहीत. आम्ही हिंदूच आहोत. पण गरीबांच्या मुलांना आरक्षण दिलं जात नाही. वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात. पण धर्माची खरी रक्षक जनता असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या, नारळ, पैसे घेऊ शकतात. खरा हिंदू धर्म वारकरी, गरीब जनता चालवत आहे. हरळ खाऊन जगणारे लोक धर्माचे ठेकेदार नसल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.