मिरवणुकीत औरंगजेबाच्या फोटोसह जल्लोष; फडणवीस म्हणाले कारवाई होणारच
अहमदनगर, ५ जून २०२३ ः मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
फकिरवाडा परिसरात असलेल्या हजरत दम्मा हरी दर्ग्यात सालाबादाप्रमाणे उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. चादर अर्पण करण्यासाठी मुकुंदनगर भागातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी हातात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत होते. मिरवणुकीदरम्यान, शक्ती प्रदर्शन करुन “बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है” अशा घोषणा देऊन दोन समाजात जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगजेबाची प्रतिमा घेऊन नाचत असल्याचा तरुणांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड भाष्य केलं आहे.
फडणवीस म्हणाले, औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर इथे मान्य केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
त्यानंतर तत्काळ अहमदनगर पोलिस दलाने व्हिडिओची दखल घेत तपासाची चक्रे फिरवली. अखेर या प्रकरणी चार तरुणांवर पोलसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्य्द उर्फ सर्फराज जहागिरदार रा. दर्गादायरा, अफनान आदिल शेख उर्फ खडा, रा.वाबळे कॉलनी, शेख सरवर रा. झेंडीगेट, जावेद शेख उर्फ गब्बर रा. आशा टॉकीज या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप